नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक प्रकार
माझ्या मते गॅसलाईटींग हा नार्सिसिस्टिक अत्याचाराचा सगळ्यात घातक आणि त्रासदायक प्रकार आहे. जेंव्हा या प्रकारचा अत्याचार किंवा मॅनिप्युलेशन होत असतं तेंव्हा बऱ्याचदा व्हिक्टिम्स ना कळतही नाही कि त्यांच्या बरोबर काहीतरी चुकीचं घडतंय कारण अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन सहजपणे , गंमत किंवा मस्करी च्या नावाखाली केलं जातं. जेंव्हा त्याचे निगेटिव्ह परिणाम दिसू लागतात तेंव्हा त्यांना जाणवतं कि आपल्या बाबतीत वर्षानुवर्षं काहीतरी चुकीचं घडतंय आणि आपल्याला ते समजलंच नाही.
तर गॅसलाईटिंग म्हणजे नक्की काय?
गॅसलाईटींग हि संकल्पना १९४० च्या गॅसलाईट नावाच्या इंग्लिश सिनेमा वरून उदयाला आली. या सिनेमामध्ये एक नवरा आपल्या बायकोला वेडी ठरवण्यासाठी त्यांच्या माजघरातले गॅस वर चालणारे दिवे सतत चालू बंद करत असतो आणि प्रत्येकवेळी त्याची जेंव्हा बायको त्याबद्दल त्याच्याशी बोलते तेंव्हा तो तिलाच उलटं म्हणतो कि तसं काहीही होत नाहीये आणि तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. ती या गोष्टी इमॅजिन करते आहे. अनेक वेळा आपल्या नवऱ्याकडून हे ऐकून ऐकून बायकोला हि तेच खरं वाटू लागतं आणि आपण खरंच वेडे झालो आहोत हे ती मान्य करते.
गॅसलाईटींग म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीला आणि भावनेला नाकारणे किंवा त्या गोष्टी किती चुकीच्या आहेत हे सतत बोलून दाखवणे.असं वारंवार झाल्याने व्हिक्टिम्स शेवटी तसाच विचार करू लागतात आणि त्यांच्या गोष्टी चुकीच्या नसल्या तरी स्वतःवरच शंका घेऊ लागतात.
तर, एखादी व्यक्ती जर सतत दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांची मस्करी करत असेल किंवा दुसऱ्या व्यक्तींच्या भावना आणि इच्छांना कमी लेखत असेल तर त्याला गॅसलाइटिंग करणे असं म्हणतात.
नार्सिसिस्ट लोक इतरांना गॅसलाइट का करतात?
नार्सिसिस्ट व्यक्ती ह्या मानसिक दृष्ट्या अतिशय असुरक्षित (mentally insecure) असतात. त्यामुळे इतरांना मॅनिप्युलेट करून त्यांना थोडावेळ का असेना पण स्वतःबद्दल चांगलं वाटतं. तसं करून आपण दुसऱ्या व्यक्तीच्या वरचढ आहोत असं त्यांना वाटत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यामुळे त्यांना त्यांचे व्हिक्टिम्स सतत त्यांच्या कंट्रोल मध्ये ठेवण्यात मदत होते. व्हिक्टिम्स कंट्रोल मध्ये असले की ते स्वतःचा विचार करू शकत नाहीत आणि नार्सिसिस्टिक सप्लाय कायम राहतो.
तुमच्या नात्यात गॅसलाईटिंग होतंय का ?
खरंच तुम्हाला कुणीतरी गॅसलाइट करतंय का याबाबत जर तुम्ही साशंक असाल,तर खालील काही लक्षणे तपासून पहा
- सरळ सरळ खोटं बोलणे आणि जरी तुम्ही ते खोटं आहे याचा पुरावा सादर केला तरीही तो पुरावा अमान्य करणे.
- तुम्ही वर्णन करत असलेली घटना कधी घडलीच नाही किंवा तुम्ही काहीतरी मनातलं रचून सांगत आहात असं सारखं म्हणत राहणे.
- तुमच्या विरुद्ध अफ़वा किंवा चुकीच्या गोष्टी पसरवणे आणि तुम्हाला सांगणे कि दुसरे तुमच्या बद्दल अफवा पसरवत आहेत
- तुम्ही जेंव्हा त्यांच्या खोटेपणा विषयी किंवा चुकीच्या वागणुकीविषयी त्यांच्याशी बोलायचं प्रयत्न करता तेंव्हा ते सरळ नाकारणे किंवा विषय बदलणे.
- तुम्ही जेंव्हा तुमच्या भावना व्यक्त करता तेंव्हा तुम्हाला अति भावनिक , अति विचारी किंवा अविचारी म्हणणे.
- जरी त्यांची चूक असली तरी विषय बदलून किंवा चुकीच भांडण उकरून काढून चूक तुमचीच आहे आणि तेच स्वतः किती बिचारे आहेत असं म्हणणे.
- आपल्या चुकीच्या वागण्याला मस्करी किंवा गंमत म्हणत तुम्हिच किती इमोशनल आहात असं म्हणणे.
- तुमच्या कुटुंबातल्या ज्या इतर व्यक्तीना किंवा मित्रमंडळीना त्याच्या चुकीच्या वागण्याची कल्पना येते त्यांच्याशी काहीतरी करून भांडण उकरून काढणे आणि त्यांना तुमच्या पासून दूर करणे.
गॅसलाईटिंगचा व्हिक्टिम्सवर कसा परिणाम होतो?
सतत व्हिक्टिम्स ना ते किती चुकीचे , विचित्र विचार करणारे आणि गोंधळलेले आहेत असं ऐकवून गॅसलाइट करणारी व्यक्ती व्हिक्टिम्स च्या मनावर फार खोलवर परिणाम करत असते. “स्वतःच्या भावना आणि इच्छा खरंच चुकीच्या आहेत का ?” असा विचार व्हिक्टिम्स करू लागतात.
यामुळे घराबाहेर इतर लोकांच्या समोर त्यांना स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची भीती वाटू लागते. “जर मी चुकीची असेन तर माझी मतं लोकांसमोर मांडून स्वतःच उगाच हसं का करून घ्या ?” या विचाराने बहुतेक वेळा व्हिक्टिम्स त्यांची मतं आणि भावना व्यक्तच करत नाहीत. ते लोकांना भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं टाळू लागतात. अशा एकलकोंडेपणा मुळे व्हिक्टिम्स अति चिंता (anxiety) आणि नैराश्य (depression) यांच्या आहारी जाऊन कधी कधी आत्मघातकी विचारही करू लागतात.
गॅसलाईटिंग व्हिक्टिम्सचे काही विचार /लक्षणे खालीलप्रमाणे :-
- छोटे छोटे निर्णय घेताना १०० वेळा विचार करावा लागणे किंवा कुणाचातरी सल्ला विचारणे.
- आपलं मत ठामपणे मांडण्याऐवजी आपण चुकीचे असलो तर? हा विचार करून गप्प रहाणे.
- सतत सतर्क आणि छोट्या छोट्या गोष्टींना घाबरून असणे.
- आपण खरंच खूप इमोशनल आहोत असा समज करून घेणे.
- आपण खरंच वेड्यासारखे वागतो का असा सतत विचार करत राहणे.
- आपण कोणतीही गोष्ट चांगली करु शकत नाही या विचाराने सतत दुःखी राहणे.
- काहीही कारण नसताना सतत दुसऱ्या व्यक्तीची माफी मागणे.
- आपण या जगात पूर्णपणे एकटे आहोत. या दलदलीत आपण पूर्णपणे अडकलेले आहोत आणि जगात कुणीच आपल्याला समजू किंवा वाचवू शकत नाही असं वाटणे.
या सगळ्या गोष्टी नार्सिसिस्टिक नात्यात अगदी कॉमन असतात. म्हणूनच वरवर जरी फक्त चेष्टा आणि मस्करी वाटत असली तरीही गॅसलाईटिंग हा मानसिक अत्याचाराचा एक भयानक प्रकार आहे.
गॅसलाईटिंग पासून स्वतःला कसे वाचवाल?
वरीलपैकी अगदी काही गोष्टी जरी तुमच्या सोबत किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत होत असतील तर कृपया लवकर सावध व्हा !
- कितीही चुकीचं वाटत असलं तरी बोला व्यक्त व्हा
- गॅसलाइट करणाऱ्या व्यक्तीचा मूळ हेतूच तुम्हाला एकटं पाडणे हा असतो जेणेकरून तुम्ही त्यांच्या सतत कंट्रोल खाली राहता. त्यामुळे तुमच्या बरोबर जे होतंय ते बाहेरच्यांना सांगणं कितीही चुकीचं वाटत असलं तरी तुमच्या मित्र मैत्रिणींशी किंवा जवळच्या विश्वासातल्या माणसांशी मोकळेपणाने त्या बद्दल बोला . कुठेतरी व्यक्त व्हा !
- ऐकावे जनाचे करावे मनाचे
- समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते किंवा आपल्याला काय सांगते यामुळे आपण चांगले किंवा वाईट होत नाही. फक्त कुणीतरी आपल्याला चुकीचं म्हणतंय म्हणून आपण चुकीचे होत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला काहीही बोलली तरी जे मनाला पटतं तेच करा.
- दुसऱ्यांचे विचार बदलण्याचा प्रयत्न करू नका
- जर एखादी व्यक्ती तुम्हाला सतत चुकीचं ठरवत असेल तर त्यांचे विचार बदलण्यासाठी स्वतःच्या वागण्यात बदल करू नका . त्यांचे विचार तुम्ही काहीही केलं तरी बदलणार नाहीत.बदलेल्या तुमच्यातही त्या व्यक्ती काही ना काही त्रुटी नक्कीच काढतील.
- स्वतःला आहे तसच स्वीकारा
- सेल्फ अवेरनेस किंवा मेडिटेशन चे प्रयोग करून स्वतःला तुम्ही जसे आहेत तसे स्वीकारा. या जगात कोणताही माणूस १००% योग्य किंवा अयोग्य नसतो. जेंव्हा तुमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल तुम्ही स्वतः जागरूक होता तेंव्हा इतर कुणीही तुम्हाला कितीही वाईट किंवा चुकीचं म्हटलं तरीही तुमच्यावर त्याचा परिणाम होत नाही.
- शक्य असेल तर एखाद्या life coach किंवा mental health professional ची मदत घ्या
- कधी कधी जवळच्या व्यक्तींपेक्षा एखाद्या त्रयस्थ व्यक्ती कडे आपलं मन मोकळं करणं खूप सोपं असत. जर तुम्हाला शक्य असेल तर नार्सिसिस्टिक किंवा इमोशनल अब्युझ या विषयांमध्ये माहिती आणि अनुभव असणाऱ्या एखाद्या प्रोफेशनल कौन्सेलर ची मदत घ्या. जर कौन्सेलर शक्य नसेल तर एखादा प्रोफेशनल कोच जो तुमच्याशी या विषयावर फक्त बोलू शकेल किंवा तुमचा म्हणणं ऐकू शकेल अशा व्यक्तीशी बोला.
गॅसलाईटिंग हा मानसिक अत्याचाराचा खूप घातक प्रकार आहे पण तो तेवढाच कॉमन सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही जर थोडासा रिसर्च केलात तर तुमच्या सारख्या परिस्थितीत असणारे अनेक लोक सापडतील आणि तुम्हाला मदत करणारे पण खूप सापडतील .
तुम्हाला माझी हि गॅसलाइटिंग बद्दलची माहिती कशी वाटली किंवा याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला ई-मेल करून नक्की कळवा..

One Comment Add yours