कुठलंही नातं जेंव्हा नुकतंच सुरु झालेलं असतं किंवा नव्याची नवलाई असते तेंव्हा एकमेकांना समजून घेण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अधिक जवळ येण्यासाठी सगळेच थोड्याफार प्रमाणात त्या समोरच्या व्यक्तीच्या कलाने घेत असतात. एका नॉर्मल नात्यात हा काळ त्या नात्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो. पण नार्सिसिस्टिक नात्यात वर वर जरी हा काळ तसाच नॉर्मल सुंदर काळ वाटत असला, तरीही नार्सिसिस्टिक व्यक्तीच्या दृष्टीने तो आपल्या सावजाच्या अभ्यासाचा काळ असतो.
लव्ह बॉम्बिंग म्हणजे काय ?
नार्सिसिस्टिक व्यक्ती या काळात त्यांच्या व्हिक्टिम्स बरोबर आणि त्या व्हिक्टिम्सच्या जवळ असणाऱ्या सगळ्या व्यक्ती बरोबर अतिशय प्रेमाने आणि आपुलकीने वागतात. खास करून रोमँटिक नार्सिसिस्टिक रिलेशनशिपमध्ये,व्हिक्टिम्सना खूप महागडी गिफ्ट देणे, त्यांच्या साठी वेगवेगळ्या खास गोष्टी प्लॅन करणे आणि त्यांना सतत ते किती स्पेशल आहेत हे सांगत राहणे असं सगळं लव्ह बॉम्बिंग फेज मध्ये सतत घडत राहतं.
यापेक्षा चांगली व्यक्ती आपल्याला भेटूच शकत नाही असं व्हिक्टिम्स ना वाटू लागतं. साहजिकच ते या नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि आपली सगळी गुपितं आणि पर्सनल गोष्टी सहजपणे त्या व्यक्तीला सांगतात.
नार्सिसिस्टिक लोक आपल्या व्हिक्टिम्स वर जो हा खोटा प्रेमाचा वर्षाव करतात त्याला म्हणतात लव्ह बॉम्बिंग.
जेंव्हा नातं जुनं होतं तेंव्हा काही काळाने व्हिक्टिम्सना नार्सिसिस्टिक व्यक्तीचा खरा चेहरा दिसू लागतो. जेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्तीला व्हिक्टिम्स आपल्या ताब्यातून आणि कंट्रोल मधून निसटत आहेत असं वाटू लागतं तेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्ती पुन्हा त्या सुरुवातीच्या अभ्यासाचा वापर करून व्हिक्टिम्सना आवडणाऱ्या गोष्टी आणि प्रेमाचा वर्षाव करू लागतात. यामुळे व्हिक्टिम्स पुन्हा एकदा नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात आणि नार्सिसिस्टिक व्यक्ती आपला कंट्रोल परत मिळवतात. आणि हे चक्र जोवर नातं चालू आहे तोवर चालूच राहतं.
असं अजिबात नाही कि सगळे लोक जे प्रेम व्यक्त करतात ते लव्ह बॉम्बिंगच असतं. पण ते प्रेम व्यक्त करणं जर खूप सतत आणि गरजेपेक्षा जास्त होत असेल तर नक्कीच तो हा पुढे घडणाऱ्या इमोशनल अब्युझचा एक मोठा रेड फ्लॅग असतो.
मिररिंग
मिररिंग ही नार्सिसिस्टिक लोकांची लव्ह बॉम्बिंग करण्याची एक पद्धत आहे. एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं तर मिररिंग म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आरसा बनणे, जेणेकरून त्या व्यक्तीला आपलंच प्रतिबिंब समोर दिसतंय असं वाटतं.यामुळे नार्सिसिस्टिक व्यक्ती अगदी आपल्यासारखीच आहे असं व्हिक्टिम्स ना वाटू लागतं आणि ते सहजपणे नार्सिसिस्टिक व्यक्तीकडे आकर्षित होतात.
नार्सिसिस्टिक लव्ह बॉम्बिंग ची काही लक्षणे
१. खूप ओळख किंवा संबंध नसतानाही,खास करून जेंव्हा नातं अजून पक्क झालेल नसतं तेंव्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी खूप महागडी गिफ्ट्स आणणे , महागड्या ट्रिप्स प्लान करणे. त्यांच्यावर भेटवस्तू आणि surprises चा वर्षाव करणे.
२. अति कौतुक करणे किंवा विशेष संबंध नसतानाही उगीच सतत प्रशंसा करत राहणे.
३. तुमच्या आवडीनिवडी आणि स्वभावाचा अभ्यास करून तुम्हाला जे आणि जसं हवं तसंच वागणे आणि बोलणे.
४. फारशी ओळखही नसतानाहि दुसरी व्यक्ती त्यांची सोलमेट आहे असं म्हणणे.
५. तुम्ही सतत त्यांच्या सोबत राहावं आणि दुसऱ्या कुणाही पेक्षा त्यांना जास्त महत्व द्यावं असा प्रेमळ आग्रह करणे.
- तुम्ही त्यांच्या कॉल्स ना किंवा मेसेजेसना इमिडिएट रिस्पॉन्स द्यावा अशी अपेक्षा करणे.
- बाकी कुठल्याही गोष्टी करण्यापेक्षा त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्यावं हा आग्रह धरणे.
- जेंव्हा तुम्ही ते सोडून दुसऱ्याबरोर वेळ घालवता तेंव्हा तुमच्यावर राग किंवा अबोला धरणे.
- तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून किंवा मित्रमैत्रिणींपासून दूरदूर राहून तुम्ही फक्त त्यांच्याबरोबरच वेळ घालवावा असा आग्रह धरणे.
६. तुम्ही जेंव्हा नात्यात स्वतःच्या मर्यादा मांडता त्यावेळी त्या मर्यादांचा आदर न करणे किंवा तुम्ही मर्यादा घातल्या म्हणून तुमच्यावर रागावणे.
नार्सिसिस्टिक व्यक्ती लव्ह बॉम्बिंग का करते?
नात्याच्या सुरुवातीच्या काळात व्हिक्टिम्सच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या व्हल्नरेबिलिटीज जाणून घेण्यासाठी नार्सिसिस्टिक व्यक्ती लव्ह बॉम्बिंग करतात. व्हिक्टिम्सचा नार्सिसिस्टिक व्यक्तीवर विश्वास बसला कि ते आपले सगळे विचार,आवडत्या , नावडत्या , भीती वाटणाऱ्या अशा खाजगी गोष्टी हळू हळू नार्सिसिस्टिक व्यक्तीला विश्वासाने सांगू लागतात. नार्सिसिस्टिक व्यक्ती मात्र त्याच गोष्टी पुढे व्हिक्टिम्सना गॅसलाइट आणि त्यांच्यावर ताबा ठेवण्यासाठी वापरते.
त्यांचा लव्ह बॉम्बिंग करण्याचा मुख्य हेतूच व्हिक्टिम्सना खोटं प्रेम दाखवून नात्यात अडकवून ठेवणे हा असतो जेणेकरून त्यांचा “नार्सिसिस्टिक सप्लाय” कायम राहतो.
लव्ह बॉम्बिंगचा व्हिक्टिम्सवर काय परिणाम होतो ?
जेंव्हा पहिल्यांदा लव्ह बॉम्बिंग होतं तेंव्हा त्याला ओळखणं खूपच कठीण असत कारण हे सगळं अतीव प्रेम खरंच आहे असा बहुतेक व्हिक्टिम्सना वाटत असत. पण जसं जसं नातं जुनं होतं तसतसं व्हिक्टिम्सना नार्सिसिस्टिक व्यक्तीच्या गॅसलाइटिंग आणि तत्सम इतर मॅनिप्युलेशन्स ना सामोरं जावं लागत. त्यावेळी त्यांना कुठे ना कुठे या सुरुवातीच्या अतिप्रेमाची जाणीव होऊ लागते. त्यामुळे ते आपल्या अब्युझर पासून दूर होऊ लागतात.
पण, जेंव्हा नार्सिसिस्टिक व्यक्तीला हे जाणवतं तेंव्हा ती व्यक्ती पुन्हा लव्ह बॉम्बिंग करुन त्यांच किती प्रेम आहे आणि ते नातं किती सुंदर आहे अशी जाणीव व्हिक्टीमला करून देते.व्हिक्टिम्सना पुन्हा असं वाटू लागतं कि नार्सिसिस्टिक व्यक्ती खरंच त्यांच्यावर प्रेम करते आणि ते पुन्हा त्या व्यक्तीच्या जवळ जातात. आणि हेच चक्र वर्षानुवर्षे चालू राहते.
काही काळाने मात्र, या सततच्या प्रेम आणि वाईट वागणुकीच्या चक्रात व्हिक्टिम्स थकून जातात आणि त्यांना काय खरं आणि काय खोटं हेच समजेनासं होतं. ते गोंधळून जातात आणि त्यांच्यावर इतर मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ लागतात.
लव्ह बॉम्बिंग / मिररिंग पासून स्वतःला कसे वाचवाल?
वर म्हटल्याप्रमाणे जेंव्हा पहिल्यांदा लव्ह बॉम्बिंग होतं तेंव्हा त्याला ओळखणं खूपच कठीण असत पण त्या काळात लव्ह बॉम्बिंग च्या लक्षणांना लक्षात ठेवून डोळसपणे त्या नात्याकडे बघणं खूप गरजेचं आहे.
जेंव्हा नात्यात लव्ह बॉम्बिंग आणि वाईट वागणूक यांचं चक्र सुरु होतं तेंव्हा मात्र व्हिक्टिम्सनी त्या प्रेमाला ना भुलता स्वतःच्या मर्यादा कायम ठेवण खूपच गरजेचं असतं.
एखाद्या त्रयस्थ किंवा मानसिक अत्याचाराबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तीशी बोलून आपल्या भावना आणि गोंधळ व्यक्त करण हे देखील या काळात खूप महत्वाचं असतं
अखेरीस सत्य हेच आहे कि खरं नातं फ़ुलायला थोडा वेळ जावा लागतो. जर एखादी व्यक्ती खूप लवकर नातं जोडू पाहत असेल तर त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसच जर प्रेम असेल तर कुठल्याही परिस्तिथी मध्ये ते असतं.जर कधी अतिशय प्रेम तर कधी अतिशय वाईट वागणूक मिळत असेल तर ती नक्कीच एक धोक्याची सूचना असते.
नार्सिसिस्टिक नात्यातल्या चक्रव्युहातील लव्ह बॉम्बिंग हि सर्वात घातक स्टेप आहे ज्यामुळे व्हिक्टिम्स या नात्यात वर्षानुवर्षे अडकून पडतात. तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत असं कधी झालय किंवा होतंय का ? तुमच त्या बाबतीत काय म्हणणं आहे? मला ई-मेल करून नक्की सांगा.

2 Comments Add yours